पिण्याचे पाणी, शौचालय व दैनंदिन कामांसाठीही पाण्याची समस्या; युवासेनेचे निवेदन
पोंभुर्णा : तालुक्यातील सातारा कोमटी येथील जिल्हा परिषद शाळेत पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळेत पिण्याच्या पाण्यासोबतच मुतारी, शौचालय तसेच शाळेतील इतर दैनंदिन कामांसाठीही पाण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या समस्येबाबत यापूर्वीही संबंधित प्रशासनाकडे अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही समस्या कायम असल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या वतीने गटविकास अधिकारी, पंचायत समिती पोंभुर्णा यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना गटविकास अधिकारी मॅडम यांच्याशी शाळेतील पाणी समस्येबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी समस्या गांभीर्याने लक्षात घेऊन लवकरात लवकर शाळेत पाण्याची व्यवस्था करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने शाळेत नियमित पाणीपुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने कार्यवाही करून विद्यार्थ्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दरम्यान, १५ दिवसांच्या आत पाण्याची व्यवस्था न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना, पोंभुर्णा यांच्या वतीने “भीक मांगो आंदोलन” करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख महेश श्रीगिरीवार, रजत ढोंगे, शाळा व्यवस्थापन समिती सातारा येथील अध्यक्ष लतिश ठाकरे, उपाध्यक्ष विजय सिडाम, सदस्य महिंद्र सोनुले, सदस्य सुरेखा गुरनुले, महेश ठाकरे, अजित भडके, प्रीतम भडके, नितीन गुरनुले, सत्यपाल कुळमेथे तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेऊन दिलेल्या आश्वासनानुसार तातडीने पाण्याची व्यवस्था करावी, अशी अपेक्षा उपस्थित पालक व युवासेनेने व्यक्त केली.



