Saturday, June 13, 2026
spot_imgspot_img
spot_imgspot_img

‘इरई’च्या खोलीकरणातून काढलेल्या मातीची चोरी, कंत्राटदार व मनपा अधिकाऱ्यांचे हास्यास्पद स्पष्टीकरण

नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला ‘ऑनस्पाॅट पंचनामा’, अनेक गैरप्रकार उघडकीस

चंद्रपूर : इरई नदी खोलीकरण टप्पा-२ कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप स्थायी समितीच्या खोलीकरण उपसमितीचे सदस्य प्रदीप उर्फ पप्पू देशमुख यांनी केला आहे. मनपाचे अभियंता आशिष भारती तसेच इरई बचाव जनआंदोलनाचे कुशाबराव कायरकर यांचेसह सलग तीन दिवस खोलीकरणाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी देशमुख यांनी केली. या पाहणीत सात ठिकाणी खोलीकरणातील माती जमा केल्याचे कंत्राटदार व मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. पाहणीत मातीचे ढिगारे तपासले असता रूईबन हनुमान मंदिराजवळचा मातीचा ढिगारा गायब झाल्याचे निदर्शनास आले. यावर स्पष्टीकरण विचारले असता माती चोरी गेल्याचे हास्यास्पद स्पष्टीकरण मनपा अधिकारी व कंत्राटदार यांनी नगरसेवक देशमुख यांना दिले. सात पैकी इतर चार ठिकाणी मातीचे केवळ छोटे छोटे ढिगारे लावले आहेत. कंत्राटदाराने मातीची अवैध विक्री केल्याने जागेवरून मातीच गायब झाल्याचे लक्षात आले.

या पाहणी दरम्यान निदर्शनास आलेल्या सर्व गैरप्रकारची सविस्तर लेखी माहिती नगरसेवक त्यांनी आज दिनांक 8 जून रोजी महापौर, स्थायी समिती सभापती व मनपा आयुक्त यांना दिली व खोलीकरणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी जनविकास सेनेच्या नगरसेविका मनिषा बोबडे व प्रतिक्षा येरगुडे उपस्थित होत्या.

खोलीकरणातील मातीची अवैध विक्री, थेट ‘क्यू आर कोड’ वर ऑनलाईन पेमेंट

नगरसेवक देशमुख यांनी महापौर,स्थायी समिती सभापती व आयुक्त यांना एक क्यूआर कोड दिला. या क्यू आर कोड वर ऑनलाईन पेमेंट स्वीकारून महसूल विभागाची परवानगी न घेता संबंधित कंत्राटदाराने रेतीमिश्रित मातीची थेट खाजगी ग्राहकांना विक्री केली असा गंभीर आरोप देशमुख केला आहे. कंत्राटदार एकाच कामाचे खाजगी ग्राहक व मनपा दोन्हीकडून पैसे वसूल करणार असल्याचे यावरून स्पष्ट झाले.

पाटबंधारे विभागाच्या पत्रानुसार एप्रिल २०२६ अखेरपर्यंत केवळ ४२.७२४ टीसीएम गाळ काढण्यात आला, तर मनपाच्या नोंदीत तब्बल १२१.११२ टीसीएम गाळ दाखवण्यात आला आहे. या आकडेवारीतील मोठ्या तफावतीमुळे संपूर्ण कामावर संशय निर्माण झाला आहे. कंत्राटदाराने काढलेली माती नदीच्या पात्रातच टाकल्याने खोलीकरणाच्या कामातून ही माती वगळण्यात यावी असे पाटबंधारे विभागाच्या पत्रात स्पष्टपणे नमूद आहे.

झरपट-इरई संगम परिसरातून ट्रॅक्टर व हायवा वाहनांद्वारे खाजगी लोकांना माती पुरवली जात असल्याचे फोटो व व्हिडिओ पुरावे सुद्धा देशमुख यांनी दिले.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनविकास सेनेतर्फे करण्यात आली आहे.

संबंधित खबरे
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

लोकप्रिय खबरे

You cannot copy content of this page