चंद्रपूर : महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. संत कवींनी मराठी भाषेतून अभंग, ओवीतून, तर मराठी लेखक व साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मराठी भाषेला समृद्ध केले. प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी (ता. २७) ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून चांदा पब्लिक स्कूल येथे अभंगवाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्रांगणात पालखीसोबत पाहुण्यांचे आगमन होताच टाळ, मृदुंग व अभंगाने वातावरण अगदी भक्तीमय झाले होते. प्रमुख अतिथी योगिनी देगमवार, ऐश्वर्या भालेराव, शाळेच्या संचालिका स्मिता जीवतोडे, मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी ज्ञानेश्वरी पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संतांची वेशभुषा करून त्यांची शिकवण देणारे अभंग सादर केले. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे, संत तुकाराम यांनी कळस उभारण्याचे, संत एकनाथ, समर्थ रामदास, गाडगे महाराज, गोरा कुंभार, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत जनाबाई यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले ते विद्यार्थ्यांनी त्यांच्या वचनांतून गावून दाखविले.
मुलांच्या अभंग पठणाने तसेच वेशभुषेने, भारावून गेलेल्या मान्यवरांनी मुलांना मराठी संस्कृतीचा वारसा जतन करण्याचा व त्याचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. मुख्याध्यापिका आम्रपाली पडोळे यांनी समाजाला घडविण्याच्या कार्यात भावी विद्यार्थ्यांची भूमिका काय असावी यावर मार्गदर्शन केले. यावेळी नाट्यछटेकरिता मार्गदर्शन करणारे जगदिश नंदुरकर यांना सन्मानित करण्यात आले. ही स्पर्धा पुर्व प्राथमिक विभागप्रमुख शिल्पा खांडरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली. संचालन शिक्षिका मनिषा नागोशे, विद्यार्थी वीर बल्की व पवित्रा उगेमुगे यांनी केले. आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



