एकीकडे चंद्रपूरचे भाजपाचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनवंटीवार यांनी जिल्ह्यात क्रीडा सांस्कृतिक तथा अन्य कार्यक्रमाची लडी लावली आहे दुसऱ्याकडे आमदार किशोर जोरगेवार सुद्धा त्यांच्या स्पर्धेत महाकाली महोत्सव क्रीडा महोत्सव महिला महोत्सव व अन्य कार्यक्रम आयोजित करत आहेत. पण या दोघांच्या कार्यक्रमात शासकीय फंडचा भरपूर उपयोग होत आहे त्यामुळे काही नागरिक आणि राजनीतिक नेतेगण आपली नाराजगी दाखवत आहे आणि या कार्यांपेक्षा विकासाकडे लक्ष देण्याचा दोन्ही नेत्यांना सल्ला देत आहे. याच क्रमांक जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख ने आज एक प्रेस पत्रक काढून शासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी भविष्यात गरजेपेक्षा जास्त सरकारी उत्सव किंवा स्पर्धांचे आयोजन करण्यापेक्षा जनहिताचे काम करण्यासाठी अधिक लक्ष देण्याबाबत आवाहन केलेला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या या पत्रात पप्पू देशमुख हे म्हणतात की चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय, चं.श. महानगरपालिका तसेच विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी गरजेपेक्षा जास्त सरकारी उत्सव साजरे करीत असल्याची भावना सामान्य लोकांमध्ये आहे. सततचे उत्सव व स्पर्धाच्या आयोजनामुळे प्रशासनाचा वेळ जात असल्याने शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, जनतेच्या मूलभूत समस्यांचे निराकरण करणे याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अनेक नागरिक, सामाजिक संघटना राजकीय पक्ष कार्यकर्ते यांनी सतत लेखी निवेदने देऊन, प्रत्यक्ष भेट घेऊन सुध्दा प्रशासकीय स्तरावर जनहिताच्या मागण्यांबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याची भावना जनतेमध्ये आहे.
पप्पू देशमुख यांनी पुढे लिहिलं की मी स्वतः उपरवाही तालुका कोरपना जिल्हा चंद्रपूर येथिल अंबुजा सिमेंट कंपनीचे प्रकल्पग्रस्त शेतकरी, रस्त्यावर होणारे जीवघेणे अपघात, नियम डावलून देण्यात आलेले दारू दुकानांचे परवाने, महानगरपालिकेतील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार, चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची दुरावस्था, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनातील गैरप्रकार याविषयी आपणांस लेखी पत्र दिले, वारंवार भेट घेऊन चर्चा केली. परंतु उपरोक्त सर्व बाबतीत कोणतीही ठोस कारवाई केल्याचे निदर्शनास आलेले नाही अथवा तशा प्रकारची लेखी माहिती मला प्राप्त झालेली नाही. महानगरपालिकेतील फाउंटेन घोटाळ्या विषयी आपण स्वतः अध्यक्ष असलेल्या जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे जवळपास तीन महिन्यांपूर्वी लेखी तक्रार देऊनही माझ्या पत्राच्या अनुषंगाने कोणतेही उत्तर मिळालेले नाही, कार्यवाही झालेली नाही.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेने नाली सफाई वरील मनुष्यबळ कमी केल्याने संपूर्ण शहरात सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत. सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. २५० कोटी रुपयांच्या जवळपास खर्च करूनही ७ वर्षां पासून शहराच्या अनेक भागातील नागरिकांना अमृत योजनेचे पाणी मिळालेले नाही. मनपा प्रशासन मात्र विविध प्रकारच्या स्पर्धा घेणे, उत्सव साजरा करणे यामध्ये मशगुल आहे. उत्सव व स्पर्धाच्या आडून मोठ्या प्रमाणात पैश्यांची उधळपट्टी होत असल्याने चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
सबब चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी भविष्यात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता संपल्यानंतर किमान गरजेपेक्षा जास्त उत्सवांचे व स्पर्धेचे आयोजन करणे टाळावे तसेच नागरिकांच्या समस्या सोडविणे व शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी महत्त्वपूर्ण कार्यासाठी अधिक वेळ द्यावा, अशी विनंती पप्पू देशमुख यांनी या पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना केलेली आहे.



