चंद्रपूर- आज पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांसमोर रोजगाराचा मोठा प्रश्न उभा असून त्यावर मात करण्यासाठीच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. रोजगार मेळाव्यामुळे तरूणांच्या हाताला काम मिळणार असून त्यांनी आपले भवितव्य साकारावे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एम.काटकर यांनी येथे बोलताना केले. दरम्यान
युवकांनो भारताच्या चढणघडणीत हातभार लावा असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी केले.
जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी येथील सरदार पटेल महाविद्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै रोजी सकाळी सरदार पटेल महाविद्यालयात पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी वैभव बोंगीरवार, सहाय्यक आयुक्त अमिषा तडवी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, कौशल्य विकास अधिकारी रोशन गबाळे व जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. काटकर पुढे म्हणाले की, पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांचा उद्योगांशी थेट संपर्क करण्यासाठीच सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व विद्यार्थ्यांनी उद्योगांच्या वेगवेगळ्या प्रतिनिधीशी योग्य संवाद साधून रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करावा असे नमूद केले.
यावेळी बोलताना प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे म्हणाले की, चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो आजच्या युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, संचालन डॉ. अनिता मत्ते, तर आभार प्रदर्शन रोशन गबाळे यांनी केले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जिनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.
—–
मेळाव्यात सहभागी झाल्या या प्रमुख कंपन्या : – ओमॅट वेस्ट प्रा.लि., एशियन सोलर प्रा.लि., महाराष्ट्र कार्बन प्रा.लि., गोपानी आयर्न अँड पॉवर इंडिया प्रा.लि., भावना एनर्जी, डेक्सॉन इंजिनिअरिंग (नागपूर), सनफायर सिल्ड, ताज बेव्हरेज, वैभव इंटरप्रायझेस (नागपूर), विदर्भ क्लिक 1 सोल्युशन, जे. पी. असोसिएट अँड लॅबोरेटरीज, बोर्डवाला कोचिंग इन्स्टिट्यूट, डी.एन.ए. नीट अकॅडमी, संसुर सृष्टी इंडिया, भारत पे, एस.बी.आय. लाईफ, एल.आय.सी. ऑफ इंडिया आदी.



